सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ब्रम्हचैतन्य नगरातील गणेश शिव मंदीरातील दानपेटीतील रक्कम चोरीसह ४ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आलंय. या तपासात तीन आरोपींना अटक करण्यात आली या व्यतिरिक्त मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीच्या गुन्ह्यात एका विधी संघर्ष बालकाचा समावेश होता, असं सांगण्यात आले. या ३ आरोपींकडून १,२३,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ०२ मार्च २०२४ रोजी दाखल मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीच्या गुन्ह्यातील संशयित दोन मुले ही विजापूर रोडवरील सिध्देश्वर वन-विहाराजवळ थांबले असून, त्यांनी शिव गणेश मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे स.पो.नि विजय पाटील व त्यांचे तपास पथकास मिळाली.
त्यानुसार स.पो.नि पाटील व त्यांच्या तपास पथकाने त्या ठिकाणीवरून श्रीशैल सोमनाथ तालीकोटी (वय-१९ वर्ष, रा. माशाळवस्ती, विजापूर रोड, सोलापूर) व त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांना त्याचेकडील स्प्लेंडर प्लस मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता, त्यांनी ०२ मार्च रोजी दुपारी ०४.०० वा. चे सुमारास, शिव गणेश मंदिरातील दानपेटी ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दानपेटीतील रक्कम व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा ४३,३१३ रुपयांचा मुद्देमाल दान पेटीसह जप्त करून तो गुन्हा उघडकीस आणला.
स.पो.नि विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास १५ मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-देगांव रोडवरील CNS हॉस्पीटलजवळ हायवे रोडचे बाजूस असलेल्या मारुती मंदिराचे पाठीमागे येथून बिरु राजीव सोनकर (वय-२० वर्ष, रा. कल्लाप्पावाडी, ता. अक्कलकोट) यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून जोडभावी पेठ पोलीस ठाणे व भोसरी एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड असे मोटार सायकल चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस आले. त्यात MH-25 AQ-7221स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व MH-14 EZ-1246 स्प्लेंडर प्रो मोटार सायकल चा समावेश आहे. त्याच्याकडून ६० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सराईत गुन्हेगार विशाल विकास बाबरे (वय-२५ वर्ष, रा. घर नं.२७७ विजय नगर, सुजाता टॉकीजच्या समोर, एम.आय.डी.सी, सोलापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने जून २०२२ मध्ये सात रस्ता जवळील चितळे हॉस्पीटल, सोलापूर येथे घुसून रात्रीच्या वेळी एक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
अशाप्रकारे, ०२ मोटारसायकल चोरी, ०१ मंदिर चोरी, ०१ चोरी असे ०४ गुन्हे उघडकीस आणून १,२३,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. श्रीमती दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) श्री सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पाटील व पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, राहुल तोगे, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, अजिंक्य माने, धिरज सातपुते, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, महिला पोलीस अंमलदार रत्ना सोनवणे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाथ पाटील, मच्छिद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.