Type Here to Get Search Results !

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी लोकांचं जीवनमान उंचावले: प्राचार्य डॉ. पाटणे


सोलापूर विद्यापीठात सहकार महर्षी व्याख्यानमाला

सोलापूर :  सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी आयुष्यभर जनतेसाठी जीवन जगले. ग्रामीण भागात गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली. शेतकरी व नागरिकांसाठी साखर कारखाना, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यासारख्या सहकारी संस्था उभ्या करून जनतेचे जीवनमान उंचावले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. 

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला २०२४-२५ अंतर्गत 'जीवन त्यांना कळले हो' या विषयावर डॉ. यशवंत पाटणे यांनी सहावे पुष्प गुंपले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा हे होते. 

यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे सचिव अभिजीत रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

डॉ. पाटणे म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांना स्वकर्तुत्व आणि सुखाने जगण्याची सोय असतानाही त्यांनी जनतेसाठी जीवन जगत कृतार्थ आदर्श निर्माण केला. माळशिरसच्या माळरानावर सहकाराचे जाळे विणत अनेक संस्था निर्माण केल्या. जीवनाचे तत्वज्ञान त्यांना समजले होते, म्हणूनच त्यांनी समाजासाठी आयुष्यभर काम केले. कर्तुत्व, दातृत्व आणि नेतृत्वाने सहकार क्षेत्रातील वैभवशाली नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला लाभल्याचेही ते यावेळी म्हणाले.

प्र-कुलगुरू प्रा. दामा म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे काम केले आहे. प्रामुख्याने शाळा, रस्ते, पाणी याचा समावेश होतो. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मोहिते-पाटील परिवाराचे मोठे योगदान आहे. ते सर्वांना सोबत घेऊन काम करायचे. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विकासासाठी सहकार्य लाभते, असे प्रा. दामा यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. हनुमंत अवताडे यांनी मानले.

...फोटो ओळी...

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे व्याख्यान झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे सचिव अभिजीत रणवरे, योगिनी घारे छायाचित्रात दिसत आहेत.