Type Here to Get Search Results !

संसदीय लोकशाही प्रक्रियेचा राजा आहे मतदार : मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे


सोलापूर : राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत. तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणा पत्राच्या आधारे त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. संसदीय लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा राजा असतो. तरी भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना मतदार कार्ड उपलब्ध झाल्यास त्यांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन

मतदानाचे कर्तव्य पार पाडता येईल, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे आयोजित मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, जात प्रमाणपत्र वाटप मेळाव्यात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी मोहोळ अजिंक्य घोडगे, मोहोळ तहसिलदार सचिन मुळीक, शेतकरी, ग्रामस्थ, युवा मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.



मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले की, एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ज्या नागरिकांना मतदार कार्ड नाही, त्यांना मतदान कार्ड उपलब्ध करून द्यावे त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करावी. जे अन्य इतर दाखले भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकाकडे उपलब्ध होत नसतील तर त्यांना स्वयंघोषणा पत्राच्या आधारे मतदार कार्ड उपलब्ध करून अशा वंचित घटकातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यानुसार सोलापूर जिल्हा प्रशासनाने  २४७ (अ.जा) मोहोळ विधानसभा मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील लोकांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे स्वयंघोषणापत्राच्या आधारे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्र देण्यात आले आहेत, हे खूप कौतुकास्पद काम झाले असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगून मतदार कार्ड उपलब्ध झालेल्या प्रत्येक नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.



यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्या हस्ते मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्त जाती जमाती मधील नवीन १३१ मतदारांना ओळखपत्र, ६१ जणांना रेशनिंगकार्ड व ६१२ जणांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विविध दाखले वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व १३१ नवीन मतदारांना मतदार कार्ड उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. या सर्व मतदारांना मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता येणार असल्याचेही सांगितले.

वडवळ येथील शालेय विद्यार्थ्यानीनी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने काढलेल्या रांगोळीची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी करून शालेय विद्यार्थिनीनीच्या मतदार प्रबोधनासाठी घेत असलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.