‘लोकमत’ला उपविजेतेपद; खा. महास्वामींच्या हस्ते बक्षीस वितरण
सोलापूर/क्रीडा प्रतिनिधी : येथील रेल्वे मैदानावर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल) ‘सोलापूर मीडिया कप -2024’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा झाला. यात सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने ‘लोकमत’चा सात गडी राखून पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ‘लोकमत’ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सिज वेल्फेअर असोसिएशन (सावा) आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ०८ संघांचा सहभाग होता. स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी पार पडली. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात ‘सावा’ संघाकडून डिजिटल मीडिया संघाला बाय मिळाला. तर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात दिव्य मराठी संघाने तरुण भारत संवाद संघाचा तब्बल ४९ धावांनी दणदणीत पराभव केला.
त्यानंतर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ‘लोकमत’ने डिजिटल मीडिया संघावर ५ धावांनी विजय संपादन करत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने दिव्य मराठी संघावर १० धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. सांयकाळी साडेचार वाजता अंतिम सामना लोकमत विरूद्ध श्रमिक पत्रकार संघ यांच्यात झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लोकमत संघाने निर्धारित ८ षटकात ७३ धावा केल्या. यात कृष्णा कोरेच्या २६ व भीमराव पाटीलच्या २५ धावांचा समावेश होता. ‘श्रमिक पत्रकार’च्या सुभाष कलशेट्टी याने ३ तर नितीन ठाकरे व सागर सुरवसे यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. प्रत्युत्तरात श्रमिक पत्रकार संघाने अवघ्या ६.१षटकात ३ बाद ७४ धावा करत विजय संपादन करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सुभाष कलशेट्टीने ३३ धावांची खेळी केली. ‘लोकमत’च्या आप्पासाहेब पाटीलने 2 बळी टिपले. ‘लोकमत’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सुभाष कलशेट्टी हा सामनावीर व मालिकावीर ठरला.
दिव्य मराठीचा फारुक शेख हा उत्कृष्ट फलंदाज, लोकमतचा उत्तम लोकरे हा उत्कृष्ट गोलंदाज तर श्रमिक पत्रकार संघाचा प्रभुलिंग वारशेट्टी हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला. विजेत्या संघात कर्णधार सागर सुरवसे, विक्रम खेलबुडे, सुभाष कलशेट्टी, नितीन ठाकरे, विक्रांत कालेकर, प्रभुलिंग वारशेट्टी, गिरीश मंगरुळे, अफताब शेख, रजनीकांत उपलंची, तात्या लांडगे, प्रितम पंडीत, मिलिंद तवटी, सचिन पवार, रोहन श्रीराम यांचा सहभाग होता.स्पर्धेचे समालोचन सूर्यकांत आसबे यांनी केले. विजेत्या व उपविजेत्या संघांना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ‘सावा’चे सचिव निशांत पोरे, जरिया फाऊंडेशनचे नजीब शेख, हाजी फारूक शाब्दी एज्युकेशनल ॲन्ड वेल्फेअर ट्रस्टचे मुजम्मील वड्डो, आपटे डेअरीचे संदिप माने, विकास पवार, गुरुकृपा एजन्सीचे कामत, ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे, लोकमतचे उपसरव्यास्थापक रमेश तावडे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने, विजयकुमार देशपांडे, समाधान वाघमोडे, किरण बनसोडे, संदिप जव्हेरी, पांडुरंग कोल्हापुरे, रोहित जोगीपेठकर, अक्षय जव्हेरी, संतोष उदगिरी, राजू हौशेट्टी, सुदेश मालप आदींसह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेसाठी ‘सावा’चे पदाधिकारी, श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व संयोजन समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले.