कासेगांव/रमजान मुलाणी :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेतील १९९७ मधील इयत्ता १० वी च्या बॅचचा स्नेहमेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्याला पुण्या-मुंबईहून वर्गमित्र आले होते, तसंच सासरहून वर्गमैत्रिणीही आल्या होता, हा स्नेहमेळावा जणू २७ वर्षाच्या जीवनातील आठवणींना होता.
बॅ. बाबासाहेब भोसले प्रशालेतील १९९७ च्या बॅचचा हा तिसरा स्नेहमेळावा होता. या वर्गातील मित्रांनी, आपण एकत्र का येऊ नये, असा विचार मोजक्या आणि संपर्कात मित्रात मांडला. त्यावर एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या संकल्पातून स्नेहमेळावा पुढे आला.
२५ वर्षाचा काळ मागे निघून गेलेला... आज काही जण आपल्या शेताच्या मातीत रमलेले ... कोणी छोट्या- मोठ्या व्यवसायात ... तर कोणी जगण्याच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी उपनगरे-महानगरात स्थलांतरित झालेला ... वर्ग मैत्रिणी दिल्या घरी गेलेल्या .... अशाही स्थितीत, पहिला स्नेहमेळावा वर्गमित्र अन् आजचे प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार शंकर मच्छिंद्र वाडकर यांच्या शेतात, २२ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला.
ती बॅच, ५३ विद्यार्थी-विद्यार्थीनींची होती, तरीही बहुसंख्येनं वर्गमित्र एकत्र आले, तो क्षण अविस्मरणीय होता, जणू एकच मागणं उरलं होतं, ' बालपण, देगा देवा ! ती घडी रौप्य महोत्सवी वर्षात आठवणी जाग्या करणारी होती, तोच बंधुभाव जाग्या करणारी होती. काल आणि आज याचा ताना-बाना करणारी होती. त्यावेळी जे आहेत अन् जे नाहीत, त्यांच्याही आठवणी पुढं आल्या.
दुसऱ्या वर्षी तीच तारीख, २२ फेब्रुवारी, दुसरा स्नेह मेळावा वर्गमित्र अमोल पाटील यांच्या शेतात पार पडला. काळाच्या रहाटगाडग्यात ज्याच्या-त्याच्या खांद्यावर संसाराचं ओझं... ज्याचा-त्याचा दिनक्रम ठरलेला... शेती, काम-धंदा या वर्तुळातून बाहेर पडून आपलं 'बालपण' जागं करण्यासाठी पुन्हश्च हजेरी लावली. २५ वर्षात आपल्या प्रपंचात दूर गेलेले, 'मित्र वणव्यातही गारव्या सारखा' म्हणून एकत्र आले.
अर्चना इटुकडे (माहेरकडील), रूपाली कस्तुरे (गाढवे), रंजना खंडागळे (कोले), शहनाज पटेल (मुल्ला), कासार, डांगे, माने या तत्कालिन विद्यार्थी उपस्थित होत्या. महादेव सोनटक्के शंकर वाडकर, विनोद कुंभार, गणेश गरड, श्याम हुडकर, पांडुरंग हेडे, एकनाथ गोवर्धन, ताजुद्दीन अत्तार, रमजान मुलाणी, सोमनाथ मुटकुळे, नवनाथ हेडे, अनिल खंडागळे, परमेश्वर डांगे, श्रीधर भुसारे, योगीराज भोज, सैपन शेख, संतोष धनवडे, नदाफ सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.