पंजाब राज्यातील अमृतसर जवळ असलेल्या श्री क्षेत्र घुमाण येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांची वस्त्र समाधी आहे. १३ व्या शतकात मुस्लिम बादशहा महंमद तुघलक यांचे सुपुत्र युवराज फिरोजशा तुघलिक यांनी संत नामदेव महाराजांचे भव्य दिव्य मंदिर उभा केले आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो संत नामदेव भक्त व वारकरी सांप्रदायिक मंडळी संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र घुमाण येथे येतात. येथील संत नामदेव दरबार कमिटीने येथे येणाऱ्या भाविकांसाठी निवासव्यवस्था व अन्नछत्र उभा केलं आहे.
गत दोन वर्षापासून भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ व देशभरातील विविध संत नामदेव शिंपी समाज संघटनांच्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र घुमाण अशी सुमारे २५०० किलोमिटरची सायकल यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर समारोप चंदीगड राजभवन येथे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते केला जातो.
संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील लाखो भाविक श्री क्षेत्र घुमाण येथे येत असल्याने या भाविकांसाठी संत नामदेव महाराज महाराष्ट्र भवन उभा करावे, अशी मागणी पालखी सोहळा पत्रकार संघाद्वारे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे करण्यात आली होती.
या मागणीस मंजुरी देत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एक कोटी रुपये देणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार या महाराष्ट्र भवन चा संकल्प सोहळा बुधवारी श्री क्षेत्र घुमाण येथे पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्या हस्ते करण्यात आला. संघाच्या वतीने श्री नामदेव दरबार कमिटीस बांधकामासाठी देणगी देण्यात आली.
याप्रसंगी पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड. विलास काटे, खजांची मनोज मांढरे, सदस्य राजेंद्रकृष्ण कापसे, घुमाणचे सरपंच नरिन्द्र सिंह निंदी, श्री नामदेव दरबार कमिठीचे सरप्रस्त हरजिन्द्र सिंह बावा, अध्यक्ष तरसेम सिंह बावा, महासचिव सुखजिन्द्र सिंह लाली, उपाध्यक्ष मनजिन्द्र सिंह बिट्टू, प्रैस सचिव सर्बजीत सिंह बावा, संतोख सिंह बावा, मुख्य सल्लागार प्रिं. गुरमुख सिंह, उपाध्यक्ष रघबीर सिंह, स्टोर कीपर सुखवंत सिंह राजू, कोषाध्यक्ष मनजीत सिंह, सुखबीर सिंह बावा, प्रितपाल सिंह, इन्द्रजीत सिंह बावा, अरविन्द्र सिंह बावा, रमेश चन्द्र बावा, मदन लाल बावा, कुलदीप सिंह बावा, रणजीत सिंह बावा, जसबीर सिंह बावा, नरेश कुमार बावा, सतनाम सिंह कुक्कू आदी उपस्थित होते.