Type Here to Get Search Results !

सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा काळाच्या पडद्याआड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी पहाटे, ०३ वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर अनेकांनी, राजकीय क्षेत्रातील सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केलीय.

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर, १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्यांनी शिक्षण घेतलं. किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. वयाच्या २७ व्या वर्षी मनोहर जोशी ते एम. ए. एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते.

त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला. शिवसेनेत आल्यानंतर त्यांची कारकीर्द झळाळली. भिक्षुक ते महापौर हा त्यांचा प्रारंभाचा प्रवास राहिला. त्यानंतर युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. 

त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री हे पदही त्यांनी भुषवलं. एका गरीब घरातून आलेले मनोहर, आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर अशा प्रकारे विविध पदांवर कार्यरत राहिले. त्यांचा राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर अधिक भर होता. त्यातूनच 'कोहिनूर' उदयास आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना 'पंत' या नावाने हाक मारत असत.

'राडा' करणाऱ्या शिवसैनिकांच्या गराड्यात मनोहर जोशी यांचा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा अशी ख्याती होती त्यामुळेच त्यांच्याकडे महापौरपद आलं, मुख्यमंत्रीपद आलं, तसंच मानाची जवळपास सगळी पदं भुषवली.

राजकीय क्षेत्रांत जोशी सरांनी नगरसेवक (२ टर्म), विधानपरिषद सदस्य (३ टर्म), मुंबईचे महापौर (१९७६ ते १९७७), विधानसभा सदस्य (दोन टर्म्स) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (१९९९ ते २००२), लोकसभा अध्यक्ष ( १० मे २००२ ते ४ जून २००४), राज्यसभेचे खासदार (२००६ ते २०१२) पदं भूषवली.

ठाकरे घराण्याच्या ०४ पिढ्या पाहिलेला नेता

२ डिसेंबर १९६१ ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा यामागचा त्यांचा उद्देश होता. १९६७ मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच. मनोहर जोशी यांनी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्याच्या ०४ पिढ्या जवळून पाहिल्या.