Type Here to Get Search Results !

आज जरी उपोषण सोडलं तरी पुन्हा बसेन ; सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मराठा आंदोलकाने सोडले उपोषण



सोलापूर : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले दीपक पवार यांनी आज दुपारी उपोषण सोडले, गरज पडल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.

सांगोला तालुक्यातील कडलास या ठिकाणचे मराठा आंदोलक दीपक पवार हे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसले होते. उपोषणामुळे प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले. दीपक पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घ्यावी, अशी विनंती केली.

यामुळे दीपक पवार यांनी आमरण उपोषण सोडत असल्याचे सांगितले, तसेच माऊली पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन गरज पडल्यास पुन्हा उपोषण करेल, असा इशारा दिला.

यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पवार यांचे बंधू सुनील पवार, शिवाजीराव चापले, हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता गायकवाड आणि इतर उपस्थित होते.

...चौकट...

समाजातील तरुण वर्ग आमरण उपोषण करत आहे. शासन फसवणूक करून काय साध्य करत आहे कळत नाही.? जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आता वृद्ध मंडळी सुद्धा अमर उपोषणाला बसणार आहेत. हे शासनासाठी लाजिरवाणी बाब असणार आहे. शासनाने आता तरी तातडीने निर्णय घ्यावा.

माऊली पवार, सकल मराठा समाज नेते

....चौकट....

मराठा आरक्षणासाठी मी उपोषण केले आहे शासनाला अजून सुद्धा जाग येत नसेल तर पुन्हा एकदा जरांगे पाटील आदेश देतील तेव्हा आमरण उपोषण करायला बसेन

दीपक पवार, उपोषणकर्ता