सोलापूर : येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरूकार कै. ल. गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीच्या वरिष्ठ बातमीदार अश्विनी तडवळकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या १८ वर्षापासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरु आणि आनंदवृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकाचे संपादक कै. ल. गो. तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. ०५ हजार रुपये रोख संशोधन शिष्यवृत्ती, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
याचवेळी दै. सकाळ तनिष्का विभाग प्रमुख रजनीश जोशी यांचा पत्रकार आणि लेखक या नात्याने पुस्तक लेखनाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार आणि ऍनालायझर या चॅनलचे संपादक सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते आणि जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीप सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुशिल कुलकर्णी यांचे 'बदलत्या युगाची माध्यमे' या विषयावर व्याख्यानही होणार आहे.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, ०२ ऑगस्ट १९३१ रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या उद्देशाने सोलापुरात स्थापन करण्यात आली. संस्थेतर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. संस्थेतर्फे वधू-वर सूचक मंडळ, गुणीजनांचा सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्यांचा सत्कार व मार्गदर्शन, शालेय मुलांसाठी पाठांतर स्पर्धा, परिसंवाद, सामुदायिक मौजी बंधन, रक्तदान शिबीर, स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर,महिला मेळावा इत्यादी उपक्रम नियमित आयोजित केले जातात, अशी माहितीही संस्थेचे अध्यक्ष डॉ. येळेगावकर यांनी दिली.
पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (ऍम्फी थिएटर) सायंकाळी ६.००वाजता होणार आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. येळेगावकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये, विजय कुलकर्णी, कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
""""""" चौकट """""""""
... या पुरस्काराचे यापूर्वीचे मानकरी
यापूर्वी कै. अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, रमेश महामुनी, एजाज हुसेन मुजावर, विजयकुमार पिसे, शांतकुमार मोरे, दत्तात्रय आराध्ये, प्रशांत जोशी, रजनीश जोशी, राजा माने, अभय दिवाणजी, श्रीकांत कांबळे, रविंद्र देशमुख, संजय पाठक, विक्रम खेलबुडे, अरविंद जोशी व रेवणसिध्द जवळेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.