सोलापूर : विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर सत्ताधारी भाजपा आणि मित्र पक्षाच्या वतीने विषय मार्गी लावू, असं भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांना म्हटलंय तर मराठा समाजाच्या प्रश्नासाठी मी नेहमी तत्पर असून आगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी आवाज उठवू असं आश्वासन सुभाष देशमुख यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना दिलंय.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघावा यासाठी पुन्हा एकदा आपले आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार व सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना भेटून आगामी विशेष अधिवेशनात आमदारानी मराठा आरक्षणावर भाष्य करुन सगेसोयरेसह आवाज उठवून ते मंजूर करुन घ्यावे, यासाठी स्थानिक पातळीवर आमदाराची भेट घ्यावी, अशा सुचना दिल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण सगेसोयरे यावर आपले मत व्यक्त करत आरक्षण मंजूर करून घ्यावे, याबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले. यावेळी दोन्ही आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही मराठा क्रांती मोर्चाला दिली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक दास शेळके, सुनील रसाळे, शेखर फंड, सुनील हुंबे, निलेश शिंदे, बाबा शेख, गणेश शिंदे, बाळासाहेब पवार, संजय घाडगे, श्रेयस बोग्गे आणि समाज बांधव उपस्थित होते.