सोलापूर : शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या पाठीवरती लढ म्हणण्याची शाब्बासकी दिली, तसंच आज विविध क्षेत्रात जे स्वतःचे कौशल्य दाखवून आपापल्या कामाचा ठसा उमटवित आहेत, त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्य करीत असताना कोणीतरी पाठीवर थाप दिली पाहिजे, या भावनेतून या कौटुंबिक गुणगौरव सोहळ्याचा आयोजन करण्यात आले असल्याचं प्रा. जिवन यादव यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त जाणता राजा बहु. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करीत असलेले घाटकोपर पोलीस स्टेशनचे पीएसआय विक्रम ताकमोगे, अजीत खरात गुरुजी, रोहीत ताकमोगे आणि व्यावसायिक फोटोग्राफर प्रमोद माने यांचा गुणगौरव सोहळा प्रा. संजय जाधव यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी पार पडला. यावेळी प्रा. यादव बोलत होते, यावेळी त्यांनी निमंत्रित गुणीजणांना शुभेच्छाही दिल्या.
या गुणगौरव सोहळ्यात प्रा.अश्विनी माने यांनी संकटावर मात करुनच यशस्वी होता येते, यश मिळवता येते. या यशस्वी गुणी जनांच्या कार्यावरून दिसून येते, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा आहेत, असं म्हटले. यावेळी सत्काराला उत्तर देताना रोहित ताकमोगे यांनी तरुणांनी उद्योजक व्हावं, असा मोलाचा सल्ला दिला.
समाजोपयोगी कार्यक्षेत्र आणि प्रशासनातील पीएसआय विक्रम ताकमोगे, आदर्श शिक्षक अजीत खरात, इंटरनॅशनल युएसए कंपनीचे महाराष्ट्राचे मॅनेजर रोहीत ताकमोगे, प्रोफेशनल फोटोग्राफर प्रमोद माने यांचा जाणता राजा बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश निळ यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे न्यू इंग्लीश स्कूल, दोड्डीचे मुख्याध्यापक गंगाधर डोके, संयोजक प्रा. संजय जाधव, पोलीस पाटील, विकास लक्के, सुनिता जाधव उपस्थीत होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कु. साधना जाधव हिने केले तर प्रशांत यादव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.