Type Here to Get Search Results !

... चंद्रभागेच्या वाळवंटात साखर वाटून जल्लोष ! मागणीला यश

 वाळू चोरट्यांना पाठीशी  घालणार्‍या अधिकार्‍यांची अखेर बदली : गणेश अंकुशराव  


पंढरपूर : तहसिलदार बेल्हेकर व प्रांताधिकारी गुरव हे वाळूचोरट्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या दोन्ही अधिकार्‍यांची बदली करावी, यासाठी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने विविध आंदोलनं केली होती. या दोन्ही अधिकार्‍यांची बदली झाल्याने आम्हाला विशेष आनंद होत असुन यानिमित्ताने आम्ही वारकरी भाविकांना साखर वाटुन हा आनंदोत्सव साजरा करत आहोत, अशी प्रतिक्रिया गणेश अंकुशराव यांनी दिलीय.

पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव आणि तहसिलदार सुशील बेल्हेकर यांची बदली झाल्यानंतर पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांना साखर वाटुन जल्लोष साजरा केला. 




प्रांताधिकारी गजानन गुरव हे महादेव कोळी जमातीला जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवत होते. थातुरमातुर कारणे सांगून जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव रिजेक्ट करून पडताळणी समितीकडे अपील करण्यास भाग पाडत होते. घटनादत्त हक्कापासून कोळी जमातीला वंचित ठेवणार्‍या या प्रतिगामी अधिकार्‍याच्या, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, महसूल विभागाचे सचिव व पालकमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची उचल बांगडी करण्यात आली. 



कोळी जमातीच्या या मागणीला यश आल्याने सर्वांना साखर वाटून आनंद व्यक्त केला आहे. या दोघांच्या बदल्या केल्याबद्दल शासनाचे आभार, परंतु जोपर्यंत चंद्रभागेतील वाळु चोरी थांबत नाही आणि आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालुच राहणार असल्याचेही गणेश अंकुशराव यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी गणेश अंकुशराव, दिपक कोरे, अप्पा करकमकर, सुरज नेहतराव, नवनाथ परचंडे, विशाल माने, सोमा वाघमारे, भैया कोरे, भैया अधटराव, सिध्देश्‍वर नेहतराव, पिंटु करकमकर, ओम करकमकर, भोला कोरे यांच्यासह महर्षी वाल्मिकी संघाचे असंख्य कार्यकर्ते व वारकरी भाविक उपस्थित होते.