सोलापूर : श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी, ०२ फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलनात बालचमूंनी सादर केलेली गीत, नृत्य आणि कलाविष्काराला जणू उधाण आलं होतं, याच बहारदार सोहळ्यात पारितोषकांचेही वितरण करण्यात आले.
शाळेच्या बालचमूंनी बहारदार नृत्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. श्री गणेश वंदना, जिंदगी एक सफर है सुहाना, राजस्थानी मिक्स सॉंग, तमिळी आदीवंटे सॉंग, शंभुराजे, रामजी की निकली सवारी, ओल्ड एज होम थीम, गोंधळ गीत, पाऊस गीत, शिवराज्याभिषेक नृत्य, रामायण नृत्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नृत्य अशा विविध प्रकारच्या नृत्यांवर कलाविष्कार सादर केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजीव भंडारी यांनी शिक्षकांना, पालकांना, व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यावर योग्य ते संस्कार, स्वच्छता, शिस्त अंगी बाणवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
पालकांना मोबाईलच्या वापरापासून मुलांना दूर ठेवण्याचा संदेश दिला, विद्यार्थ्यांनी मोठ्यांचा आदर बाळगावा आणि जीवनात एक आनंदी व्यक्तीमत्व म्हणून आपले स्थान निर्माण करावे. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासावा, असं आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजशेखर येळीकर सर यांनी शाळेने राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच सर्व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अतिशय आनंदाने, उत्साहाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संकुलातील सर्व मुख्याध्यापक,पर्यवेक्षकांनी पालकांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता बिराजदार यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. शिल्पा वाले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. कल्पना बिराजदार यांनी करून दिला तर सौ. निलांबिका बरबडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सांस्कृतिक कार्यक्रमातील गाण्यांचे निवेदन श्रीमती स्वाती तोडकरी व प्रतिमा मारलभावी यांनी केले. श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, बहुसंख्य पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.