Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभरात 'राज्य रयतेचे, जिजाऊंच्या शिवबाचे' स्वराज्य सप्ताह

 

सोलापूर : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सोमवारी, १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात 'राज्य रयतेचे, जिजाऊंच्या शिवबाचे' या स्वराज्य सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य सप्ताह साजरा करून महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान जोपासून शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर शहरचे प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामागील संकल्पना लोकांसमोर मांडणे, त्याचबरोबर शिवरायांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेची प्रेरणा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्वराज्य सप्ताहाचे प्रमुख आकर्षण शिवकालीन ५०० दुर्मीळ शस्त्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व सोलापूरातील शिवप्रेमी तसेच सोलापुरातील सर्व विद्यार्थ्यांकरिता दोन दिवस मोफत ठेवण्यात आले आहे, तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष  पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केलंय. 

या स्वराज सप्ताहात १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत रोजच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात गुरुवारी, १५ व शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी शिवकालीन दुर्मिळ ५०० शस्त्रांचे प्रदर्शन ड्रीम पॅलेस पोलीस कल्याण केंद्र, सेवासदन शाळेजवळ सरस्वती चौक, येथे  सकाळी ०८ ते रात्री ०८ वाजेपर्यंत सर्व सोलापूरकरांसाठी मोफत खुलं राहणार आहे. या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव खलील शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं करण्यात आलंय.

सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून या स्वराज सप्ताहाची सांगता होईल, असंही उभयतांनी म्हटलंय.