सोलापूर : मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचं बिल मिळण्यासाठी पाठपुरावा करताना ठेकेदाराकडं महिला सरपंच सौ. नंदाबाई पांडुरंग दिवसे यांच्या पतीने लाच मागितल्यावर १० हजार रुपये स्वीकारत असताना पांडुरंग रामचंद्र दिवसे (वय - ५१ वर्ष) याला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात सरपंच महिला व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सांगोला तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभामंडप बांधण्याचे काम ज्या ठेकेदारास मिळाले होते, काम पूर्णत्वानंतर तो बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करीत असताना महिला सरपंच सौ. नंदाबाई दिवसे यांनी अगोदर केलेल्या कामाचे ०२ हजार रुपये आणि या कामाचे ०८ हजार रुपये अशी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी त्या ठेकेदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची १७, २३ व २९ जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. याबाबत महिला सरपंच सौ नंदाबाई दिवसे यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी अगोदरचे ०२ हजार रुपये व चालू कामाचे बिल काढण्यासाठीचे ०८ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे गुरुवारी. १५ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराने महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता, महिला सरपंचाचे पती यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. यावरून महिला सरपंच व तिचा पती यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पोहवा/प्रमोद पकाले, पोशि/गजानन किणगी चापोह/राहूल गायकवाड, चापोशि/ शाम सुरवसे (सर्व नेमणूक : ला.प्र.वि.सोलापूर) यांनी पार पाडली.
"""""""" आवाहन """"""""
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असा आवाहन सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केलं आहे.
मो.क्र. 9764153999; कार्यालय क्र 0217-2312668
ईमेल dyspacbsolapur@gmail.com; Toll free no 1064