जिल्ह्यात विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ
सोलापूर : अनाथ, निराधार, उन्मार्गी व इतर मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या एकामेकांविषयी बंधुभाव सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बालकांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता आणि सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त संजय माने यांनी सांगितले.
विभागीय उपायुक्त महिला व बालकल्याण विभाग पुणे व जिल्हा महिला बालकल्याण विकास अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहालय बालगृह, कारंबा ता.उत्तर सोलापूर येथे तीन दिवसीय विभागीय चाचा नेहरु बाल महोत्सव २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त श्री. संजय माने म्हणाले, मुलांना अभ्यासासोबतच कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविता यावे तसेच बालकांचा शारीरिक विकास व्हावा या दृष्टीने कबड्डी, धावणे, गोळा फेक आदीसह विविध स्पर्धा घेण्यात येतआहेत. तीन दिवशीय बाल महोत्सवात विद्यार्थ्यांनी खेळात तसेच मनोरंजन कार्यक्रमात आपले कला गुण दाखवावेत तसेच कुठल्याही प्रकारची इजा न होता हा महोत्सव पार पाडावा, तसेच भविष्यात अनाथ मुले ही विविध क्षेत्रात नावारूपाला यावेत, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि मैदानाचे पुजन करून स्पर्धांचे उद्घाटन केले.
पुणे विभागातून आलेल्या पाच जिल्ह्यातील खेळाडूंचे आणि मान्यवरांचे महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगून या कार्यक्रमात खेळाऐवजी विद्यार्थ्यांनी आनंदही साजरा करावा, असे सांगितले. स्नेहालय बालगृह चंदा बेन शिंगवी यांनी मनोगत व्यक्त करताना, शासनाचे आणि महिला व बालविकास विभागाचे आभार मानले. यावेळी चाईल्ड लाईनचे अनोज कदम यांनी खेळाडूंना शपथ दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते चाचा नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी बाल बाल महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रिडा व कला गुण प्रदर्शित करीत भविष्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करावं, अशा शुभेच्छा मान्यवरांनी योवळी दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक शिरीष मते यांनी केले तर आभार प्रदर्शन जि. परिविक्षा वैशाली भोसले यांनी केले.