पंढरपूर : चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेलं असून पाण्यात अनेक लहान मोठे जंतू, किटक, अळ्या आढळून येत आहेत, या पाण्यात स्नान केल्यानंतर भाविकांच्या अंगाला खाज सुटत असून विविध त्वचेच्या विकारांचा सामना भाविकांना करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला असून सत्य पडताळण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व नेते मंडळींनी या पाण्यात स्नान करावं. चंद्रभागेच्या पात्रात तातडीने शुध्द व निर्मळ पाणी सोडावे, अन्यथा पालकमंत्र्यांना याच दुषित पाण्याने आंघोळ घालू ! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय.
महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळं तिर्थक्षेत्र पंढरीत भरणार्या प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेली माघी यात्रा तोंडावर आलेली असतानाच प्रदुषित झालेल्या चंद्रभागेच्या पात्राचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
चंद्रभागेच्या पात्राच्या या दुरावस्थेबाबत विविध आंदोलनं करुनही याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. आता मात्र चंद्रभागेच्या पात्राची ही दुरावस्था उघड्या डोळ्याने पाहवतही नाही, एवढी वाईट परिस्थिती बनलीय, त्यामुळे त्वरीत चंद्रभागेची स्वच्छता करुन पात्रात पाणी सोडावे, अन्यथा आम्ही वरील दिलेल्या इशार्याप्रमाणे भाविकांच्या हितासाठी आंदोलन करु, यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहीन, असंही गणेश अंकुशराव यांनी म्हटलंय.
""" चौकट """
स्नानासाठी येणार्या लाखो भाविकांची निराशा
गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेच्या पात्रातून अविरतपणे वाळू उपसा करणार्या वाळू चोरट्यांमुळे चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र खड्डे पडलेले असून वाळू चोरट्यांनी विष्णुपदानजीकच्या बंधार्याची दारे काढल्यामुळे चंद्रभागेत असलेले होते-नव्हते ते पाणीही वाहून गेले असल्याने चंद्रभागेत स्नानासाठी येणार्या लाखो वारकरी भाविकांची मोठी निराशा होत आहे.