Type Here to Get Search Results !

डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण... ! शिवराज्याभिषेक सोहळा; सोहळ्यास हजारो नागरिकांकडून उभे राहून मानवंदना

 

शिवगर्जना महानाट्यास सोलापूरकर नागरिकांचा दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

 सोलापूर : सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शिवगर्जना महानाट्याची सुरुवात कालपासून हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात झालेली आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीही हजारो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा महानाट्याचा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले शिवगर्जना हे महानाट्य नागरिकांच्या पसंतीस उतरले असून, सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर गर्दी केलेली आहे. या महानाट्यात बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व शिव जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळा असे सादरीकरण करण्यात आलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे मैदानावर उपस्थित शिवप्रेमी नागरिकांच्या अंगावर रोमांच निर्माण करणारा क्षण होता. आनंदाचा, उत्साहाचा क्षण होता... हा सोहळा म्हणजे डोळ्याचे पारणे फिटले असे आपसूक तोंडातून निघेल असाच तो क्षण होता. या दिमाखदार सोहळ्याने मैदानावर उपस्थित सर्व नागरिकांचे मन जिंकले होते. या सोहळ्यात सर्व नागरिक मैदानावर उपस्थित राहून जय शिवाजी... जय भवानी चा जयघोष करत होते. व सर्वजण उभे राहून या सोहळ्यास मानवंदना देत होते.



हा सुवर्ण क्षण म्हणजे, ०६ जून १६७४रोजी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर  पार पडला त्या क्षणाची आठवण करून देऊन संपूर्ण मराठी जनतेमध्ये या नाटकातील या राज्याभिषेक सोहळ्यामुळे त्या क्षणाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. आपण ०६ जून १६७४ रोजी प्रत्यक्ष रायगडावर उपस्थित आहोत की काय अशी भावना नक्कीच प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली असेल, याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.



प्रारंभी शिवगर्जना महानाट्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी महसूल तथा अप्पर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एसीपी राजन माने, राघवेंद्र क्षीरसागर, सहाय्यक पुरवठा अधिकारी समीर यादव, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्निल यादव आदी उपस्थित होते.



या महानाट्याचा सोमवारी, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०७ ते १० या कालावधीत तिसरा व अंतिम प्रयोग सादर होणार आहे.