Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी आई-वडिलाचं कष्ट डोळ्यासमोर ठेऊन स्पर्धेच्या युगात घ्यावी उंच भरारी : प्रा. संजय जाधव


जिजाऊ ज्ञानमंदिर संकुलातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

कोंडी : सध्या स्पर्धेच्या युगामध्ये फार मोठी स्पर्धा निर्माण झालेली असताना विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलानी आपल्यासाठी केलेली मेहनत, आपल्यासाठी केलेला त्याग लक्षात ठेऊन वाटचाल केल्यास निश्चितच यशाला गवसणी घालता येईल, असं प्रतिपादन प्रा. संजय जाधव यांनी केले.

जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, जिजाऊ मंदिर कोंडी संचलित जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या आणि याच संकुलातील  विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ झाला. याप्रसंगी प्रा. जाधव बोलत होते. 


राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने  कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी  प्राचार्या सुषमा नीळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले. यावेळी एस. पी. शिक्षण संस्था, नांदुरे चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, दोड्डी प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर डोके, मुख्याध्यापिका तेजश्री कुलकर्णी, मुख्याध्यापिका अर्चना औरादे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

शेतकरी,  कष्टकऱ्यांची मुलं शिकावी, ग्रामीण भागातील मुलींनाही उच्च शिक्षणाची संधी आपल्या गावात उपलब्ध व्हावी, या उदात्त भावनेतून संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी हे फार मोठे संकुल उभं केलं आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थापकाच्या महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेत असल्यामुळे निश्चितच आपणही आयुष्यामध्ये देशाने मला काही दिले, यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून आपण कार्यरत राहावे, असे आवाहन प्राध्यापक जाधव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. 


याप्रसंगी डाॅ.  संतोष वलगे, मुख्याध्यापक गंगाधर डोके, आणि संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी दहावीमधील मानसी खंदारे, यश श्रावण, रहनुमा खान या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात जिजाऊ ज्ञान मंदिर शिक्षण संकुलाचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आलं. बारावीच्या प्रेम जाधव, वल्लभ बुट्टा, आदित्य वाघमारे, पृथ्वीराज कांबळे, आणि फातिमा मुल्ला या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षक आणि अध्यापनाविषयी ऋण भावना व्यक्त केली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेत संदर्भात सूचना देण्यात आल्या. 

या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,  पालक,  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादासाहेब नीळ यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा.  विश्वनाथ उपाध्ये यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.