सोलापूर : माघवारी पालखी सोहळा २०२४ माघ शुध्द षष्ठीला सुरुवात झाली तिर्हे मार्ग पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या दिंड्यांचे अखिल भाविक वारकरी मंडळ, सोलापूरचे वतीने एकत्रीकरण करुन मोहोळ तालुक्यातील कुरूल, पाटकर वस्ती येथे दरवर्षी प्रमाणे भव्य गोल रिंगण सोहळा संपन्न झाला.
प्रारंभी कुरुल ग्रामस्थांच्या वतीने या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. दिंडीतील सर्व भाविकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तद्नंतर रिंगणाचे अश्व मुख्य स्थळावर आणण्यात आले. कुरुल भजनी मंडळाच्या वतीने आणि साम बाबा खोपडे, तानाजी महाराज बेलेराव, दगडू डोंगरे यांचे हस्ते पालखी व अश्वाचे पूजन करण्यात आले. दिंडी प्रमुख व विणेकरी महाराजांचा संयोजकांकडून सत्कार करण्यात आला.
" पंढरीची वारी जयाचिये कुळी लागो मज | त्याची पाय धुळी लागो मज ||" या उक्ती प्रमाणे वारकरी महिमा अगाध असून निष्ठेने सर्व वारकरी पायी चालत जात असताना " ज्ञानोबा तुकाराम" हे भजन अखंड चालू असते.
अखिल भाविक वारकरी मंडळ पालखी सोहळा समिती अध्यक्ष संजय पाटील (धकलीवाडी), शहराध्यक्ष संजय पवार, प्रदेश अध्यक्ष जोतीराम चांगभले, उपाध्यक्ष सुरेश पोखरकर, शहर उपाध्यक्ष सचिन गायकवाड, गोरख शिंदे इ. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि गोल रिंगण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला. परिसराला पंढरीचे रुप प्राप्त झाले होते. ध्वजाधारी भाविकांचे उत्साहात रिंगण पूर्ण झाले. 'मृदंग टाळकरी' भाविकांचे रिंगणही पूर्ण झाल्यानंतर 'तुळसधारी महिलांचे' रिंगण पूर्ण झाले.
तपोवृध्द असणाऱ्या 'विणेकऱ्यांचे' रिंगण पूर्ण झाल्यानंतर 'अश्वाच्या' रिंगणाला सुरुवात झाली आणि वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. " ज्ञानोबा - तुकाराम " या नामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. महिलांचा प्रतिसाद खूपच चांगला होता. कुरुल व पंचक्रोशितील भाविकांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
हा सोहळा यशस्वी करणेसाठी अखिल भाविक वारकरी मंडळ, ग्रामपंचायत कुरुल व माणिक पाटील, शत्रुघ्न जाधव, महादेव महाराज माळी, इ. कुरुल ग्रामस्थ-हनुमान भजनी भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.