Type Here to Get Search Results !

‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन अवघ्या १९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

                                                         (शिवभार:लोकसत्ता)

आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालंय. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर होती. याशिवाय सुहानी सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. अहवालानुसार, तिच्या शरीरात अतिरिक्त द्रव जमा होऊन तिचं निधन झालं. हेच सुहानीच्या अकाली निधनाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुहानीवर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी रात्री तिचं निधन झालं. शनिवारी फरीदाबाद येथे तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.