सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत तसेच हर हर महादेवचा नारा देत शनिवारी शहरातून शिवराज्याभिषेक रॅली उत्साहात निघाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त या रॅलीचे तसेच चित्ररथ देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच मावळ्यांची वेशभूषा परिधान करून सहभाग घेत शिवरायांचा जयघोष केला.
नार्थकोट प्रशालेतून निघालेली ही रॅली डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, सरस्वती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मान्यरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे मार्गस्थ झाला. शिवराज्याभिषेक रॅलीमध्ये हिराचंद नेमचंद कॉलेज, वालचंद कॉलेज, शिवाजी रात्र महाविद्यालय, शिवदारे फार्मसी कॉलेज, विद्यापीठ अधिविभाग, बुर्ला कॉलेज, डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.