सोलापूर : १०६ किलो गांजा ताब्यात बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या वकिलांनी मुबंई उच्च न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सिद्धार्थ ननवरे (रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर) यास जामीन मंजूर केला.
या प्रकरणाची हाकिकत अशी की, नार्कोटिक सेल कस्टम यांना टीप मिळाली होती की, आरोपी हे मुंबई येथे डिलिव्हरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन जात आहेत. सदरच्या माहितीवरून नार्कोटिक सेल कस्टम यांनी आरोपींना अडवून त्यांच्या गाडीचा पाहणी केली असता, गाडीच्या डिक्कीत १०६ किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ नरवरे व त्याच्या साथीदारांना गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली.
सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार्थ ननवरेचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकीलांनी आपल्या युक्तिवादामध्ये असे नमूद केले की, आरोपी सिद्धार्थ ननवरे हा सदरच्या गाडीचा मालक नसून गाडीच्या डिक्कीत गांजा सापडल्यामुळे त्याचा या गुन्ह्यात सहभाग आहे, असे सिद्ध होत नाही, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी सिद्धार्थ ननवरे याची जामीनवर मुक्तता केली.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. विलासिनी बालसुब्रमण्यम, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे यांनी तर सरकारतर्फे ॲड. ए. ए. पालकर तर कस्टम नार्कोटिक सेलतर्फे विशेष सरकारी वकील अमित मुंडे यांनी काम पाहिले.