Type Here to Get Search Results !

०३ मोटरसायकलींसह ११२० लिटर हातभट्टी दारु जप्त ; राज्य उत्पादन च्या भरारी पथकाची कारवाई


सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद रोडवर तीन दुचाकीस्वारांना हातभट्टी दारुची वाहतूक करतांना पकडले.  
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने, गुरूवारी, ०१फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा या  हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणावरुन सोलापूर शहरात दारुचा पुरवठा करणाऱ्या ३ मोटरसायकली पकडल्या. 

या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर-हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बालू काशिनाथ पवार (वय-३९वर्षे, रा. मुळेगाव तांडा) या इसमास पाच रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारु त्याच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्र MH13CG4761 वरुन वाहतूक करतांना पकडले. तसेच सुरेश शंकर राठोड (वय-४० वर्षे रा. मुळेगाव तांडा) या इसमास पाच रबरी ट्यूबमध्ये 400 लिटर हातभट्टी दारु त्याच्या सुझुकी एक्सेस दुचाकी क्र MH13 DS 9209 वाहतूक करतांना ताब्यात घेतले. 

अन्य एका कारवाईत गोविंद बाबू चव्हाण (वय -३९वर्षे, रा. मुळेगाव तांडा) याला त्याच्या सुझुकी एक्सेस दुचाकी क्र MH 13DN 7428 वरुन चार रबरी ट्यूबमध्ये 320 लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून सत्तावन हजार चारशे किंमतीच्या दारुसह एकूण दोन लाख सत्तावन हजार चारशे किंमतीचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली. 

... आवाहन ...
सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून येणाऱ्या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. सर्व नागरिकांना, त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.