सोलापूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग यांच्या वतीने रविवारी कर्नाटकातील हुबळी येथे महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे आठ हजार श्री सदस्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी सुमारे दोन हजार टन कचरा काढून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. प्रतिष्ठानच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमात सदगुरु बैठकीतील श्री सदस्यांचा सहभाग नेहमीच हिहिरीने दिसून येतो. हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरातही सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
सकाळी सहा वाजल्यापासूनच बैठकीतील सदस्यांनी हाती झाडू घेत शहरातील सुमारे अडीचशे मार्गावरील स्वच्छता करण्यास एकाचवेळी सुरुवात केली. अचानक मोठ्या प्रमाणात आलेल्या स्वयंसेवकांकडून व तेही अत्यंत शिस्तीबध्द वातावरणात शहरात स्वच्छता होत असल्याचे पाहून हुबळीकरांनी आश्चर्य व्यक्त केले. याप्रसंगी स्थानिक प्रशासनाकडून कचरा विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात आले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच सदगुरु बैठकीतील सदस्यांनी सकाळी ०६ ते ११ या वेळेत हुबळी शहर चकाचक करुन हुबळीकरांनाही आश्चर्याचा धक्का दिला. अध्यात्मिक प्रबोधनात असलेल्या सदस्यांकडून करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची हुबळीकराकडून भरभरुन कौतुक करण्यात आले.
सोलापूरातील सदगुरु बैठकीतील सदस्यांना हुबळी येथे जाण्यासाठी रेल्वेची सुविधा निर्माण करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी सोलापूरातील सदस्य रेल्वेने हुबळीकडे रवाना झाले होते. पहाटे पाचच्या दरम्यान हुबळी येथे सदस्यांचे आगमन झाले. यानंतर सदस्यांनी महास्वच्छता अभियानात सहभाग घेतला. सायंकाळी पुन्हा रेल्वेने सदस्य सोलापूरला परतीच्या दिशेने निघाले.