सोलापूर झेडपीत कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून वेधले लक्ष
सोलापूर : केंद्र शासनाच्या कर्मचारी कामगार धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा व तालुका शाखा सोलापूर यांच्या वतीने शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग व कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, खाजगीकरण थांबवा, वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करा, यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकाळी १० ते ११ वा.दरम्यान एक तास वॉक आऊट आंदोलन करण्यात आले. हे लक्षवेधी 'वॉक आउट' आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्यालय, पंचायत समिती स्तरावर करण्यात आले. सदर आंदोलनाचे व मागण्यांचे निवेदन, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देऊन शासनाकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली आले.
या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, मराठा सेवा संघ जि. प. शाखा, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा संघटना, मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी संघटना यांच्यासह इतर कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी व सभासद यांनी भाग घेतला.
अक्कलकोट, मोहोळ, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा व माळशिरस येथील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन आंदोलन यशस्वी केले. त्याबद्दल सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे यांनी आभार मानले.