सोलापूर/रमजान मुलाणी
संत-महंतांचे वास्तव्य लाभलेल्या सोलापूर शहराजवळ 'समाधान' केंद्रामध्ये भव्य ध्यानमंदिर निर्माण करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. पूज्य महास्वामीजींचे जंगम महापूजा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर भूषवित असून यावेळी हिवरे बाजारचे सरपंच 'पद्मश्री' पोपटराव पवार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती डॉ. शिवरत्न शेटे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर तळे हिप्परगेनजीक समाधान केंद्र निर्माण करण्यात आलंय. या समाधान केंद्रात " मन:शांती " साठी भव्य ध्यानमंदिर उभारण्यात आलं असून त्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सप्ताहभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचे डॉ. शिवरत्न शेटे यांनी समाधान केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना प्रारंभी म्हटले.
ध्यानमंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दिनांक ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ०६ ते रात्री ०८ वा. दरम्यान श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या पावन उपस्थितीत श्री.ष. ब्र. शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी यांचं प्रवचन होईल. गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 'माझे आरोग्य माझ्या हातात (घरगुती उपचार) या विषयावर डॉ. हनुमंत मळली पारंपारिक वैद्य मार्गदर्शन करणार असून सायंकाळी ०७ ते रात्री ०८.३० वा. दरम्यान ' चला संस्कार घडवू या ' या विषयावर डॉ. शिवरत्न शेटे मार्गदर्शन करतील.
शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ध्यान मंदिराच्या उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री. ष. ब्र. संगमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, श्री. ष. ब्र. प्रभुकुमार शिवाचार्य महास्वामीजी, श्री. ष. ब्र. घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच श्री म. नि. प्र. सदाशिव महास्वामीजी या स्वामीजींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी प्रमुखातिथी म्हणून हिवरे बाजार सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, आमदार सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट व डॉ. शिवरत्न शेटे उपस्थित राहणार आहेत. सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील, असं डॉ. शेटे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस डॉ. शरणबसप्पा दामा, अशोक लोखंडे, महेश पाटील, सिद्धेश्वर किणगी, संगनबसवा स्वामी, प्रशांत बेत, दत्तकुमार साखरे, राजशेखर शेट्टी, अप्पू जिगजीणी, मल्लिनाथ बिराजदार, सोमशेखर तेल्लूर, महालिंग परमशेट्टी आणि प्रकाश खोबरे उपस्थित होते.