सोलापूर : " देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे" अशी एक म्हण आहे. या म्हणीची काही अंशी प्रचिती सोमवारी शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवली. निमित्त होतं, गाजरे परिवाराच्या शेतावर त्यांनी आयोजित केलेल्या वनभोजनाचे ! गाजरे कुटुंबीयांनी या आडून सकल समाजापुढे जो एक आदर्श ठेवला आहे, त्यातून प्रेरणा घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या 'कर्णा' सारखं नाही जमलं तरी गाजरे कुटुंबीयांसारखं दानशूर नक्की बनतील, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केलीय.
गाजरे मळ्याचं सौंदर्य द्राक्षे, पेरू, चिकू,अंजीर, आंबा कितीतरी फळांच्या झाडांनी फुललेले आहे. वर्षभर ही ना ती फळं, त्या फळझाडांची श्रीमंती दाखवतच असतात. त्यांनी सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांचं रांगोळी, फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करून केलं होतं, तसंच स्वागत यावर्षी त्यांनी केलं. नांवांतच गोडवा असणारी ही माणसं ' गाजरा ' हूनी गोड अनुभवली.
फळझाडांच्या गर्द सावलीत बसून मुलांनी आधी डबा फस्त केला. त्यानंतर रंगला विविध खेळांचा डाव... मनोरंजानात्मक खेळातून व्यायामाबरोबरच निकोप स्पर्धा पार पडल्या. मुलीतून हर्षदा रोकडे ही सर्व स्पर्धात प्रथम आली तर मुलांमध्ये ओम भोज आणि रुद्र यांनं बाजी मारली. टांगलेली जिलेबी खाणे या अनोख्या खेळात तर जणू हास्याचे फवारे उडाले.
स्पर्धा आणि मनोरंजनाचा आनंद लुटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गाजरे बंधूनी भोजनाची व्यवस्था केली होती. दाल-चावलसोबत फक्कड जिलेबी... असा हा मेनू ! एवढ्यावरच न थांबत सर्व मुलांनी पेरू आणि चिकू या रानमेव्याचा आस्वाद ही मनसोक्त चाखला, काहींना ते संपवणं अशक्य होतं, त्यांनी ते पिशवीत भरले. खरंच दानत घ्यावी तर गाजरे बालाजी, संभाजी अन् ज्ञानेश्वर भावंडांकडूनच... !
असे क्षण अनुभवले की," शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात, किती आपलं भाग्य असतं, जेव्हा ती आपली असतात " आज या शब्दसमूहाचा अर्थ वास्तवात अनुभवत शेवटी सर्वांचे आभार मानून वनभोजन पूर्णत्वास गेले अन् सर्व विद्यार्थी सांजवेळी परतीच्या वाटेवर निघाले. गाजरे कुटुंबीयांनी या आडून जो एक आदर्श सकल समाजापुढे पुढे ठेवला, त्यातून प्रेरणा घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या 'कर्णा' इतकं नाही, जमलं तरी गाजरे कुटुंबीयांसारखं दानशूर नक्की बनतील, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केलीय.