सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याबरोबरच महिला सुरक्षेबरोबरच पोलीस आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी करण्यावर आपला भर राहील, असंही नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले.
मावळते पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून त्यांनी सोमवारी सायंकाळी ०४ वाजता पदभार स्विकारला. पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारल्या. यावेळी आयुक्तालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी आहे, असा विश्वास निर्माण होण्याच्या दृष्टीने मी व माझी संपूर्ण टीम कार्यरत राहील. क्राईम कमी करण्यावर आपला भर असणार आहे. पोलीस आणि जनता यांच्या संवादाचा सूर मिळावा या दृष्टीने सुद्धा अधून-मधून आपण अशा कार्यक्रमाचं आयोजन करू, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मावळते आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी अतिशय चांगले काम केले आहे, असे सांगून येत्या काळात आपण गत १० वर्षाच्या क्राईम रेटसंदर्भात माहिती मागवून आणखी त्यात काय सुधारणा करता येईल, यावर आपला भर असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत वाढते डिजिटल, फ्लेक्स बोर्ड तसेच मिरवणुकीतील डीजे चे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना आपण पोलीस प्रशासनाला देणार आहोत, असंही नूतन पोलीस एम. राजकुमार यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हटले.
यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांच्यासह सहा. पोलीस आयुक्त राजन माने, प्रांजली सोनवणे, उदयसिंह पाटील, वाहतूक शाखेचे धनराज शिंगाडे, यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.......चौकट........
कडक शिस्तीचे अधिकारी असा बोलबाला
सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे २०१० च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. मूळचे चेन्नई येथील एम. राजकुमार यांची प्रथम नियुक्ती महाराष्ट्रातच झाली. मुंबई, नागपूर, यवतमाळनंतर जळगाव येथे त्यांनी विविध पदावर काम केले. ते पदोन्नतीने पोलीस आयुक्त म्हणून सोलापुरात आलेत. ते, जळगाव येथे पोलीस अधिक्षकपदी कर्तव्य बजावत असताना अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी असा त्यांचा बोलबाला होता. त्यांनी केवळ १५ महिन्याच्या कालावधीत शहरातील ५६ नामचीन गुंडांवर मोक्कातंर्गत कारवाई केली, हेही त्यांच्या कार्यकालाचं वैशिष्ट्य राहिले.
.... चौकट....
निरोप अन् पदभार एकाच दिवशी
सोमवारी दुपारी नूतन आयुक्त एम. राजकुमार यांचे पोलीस आयुक्तालयात आगमन झाले. त्यांनी यापूर्वीचे आयुक्त डॉ.राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर पार पडलेल्या निरोप समारंभात, अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी डॉ. माने यांच्या कार्याचं कौतुक केले. तसंच उत्कृष्ट सेवा करण्याची ही नूतन आयुक्तांना ग्वाही दिली.