Type Here to Get Search Results !

कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी करावेत प्रयत्न : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगार अथवा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग तसेच संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अंतर्गत प्रशिक्षण घेतलेला एकही उमेदवार रोजगारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे, जिल्हा समन्वयक कृष्णा यादव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. बी.काटकर यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2023-24 बॅच वाटप करत असताना कौशल्य विकास विभागाने जिल्ह्यातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व अधिकृत संस्था शासनाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण उमेदवारांना देत आहेत का यावर नियंत्रण ठेवावे. वेळोवेळी याचा आढावा घेत राहावा. कोणत्याही प्रकारे शासन नियमाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण होत असल्याची खात्री करावी. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना रोजगार अथवा स्वरोजगार उपलब्ध करण्याबाबत ही प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सारथी अंतर्गत विकास कार्यक्रम सुरू करणे रे नगर येथे कौशल विकास केंद्र सुरू करणे समितीमध्ये नवीन निमंत्रित सदस्याचा समावेश करणे आदि बाबींचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

प्रारंभी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे व सहाय्यक संचालक हनुमंत नलावडे यांनी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यावर्षी जिल्ह्यातील सर्व अधिकृत कौशल्य विकास केंद्रांना 500 उमेदवारांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून कौशल किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022- 23 अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्राचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात 10 उमेदवारांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.