Type Here to Get Search Results !

शिक्षकांचे १०० टक्के अनुदानासह अन्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे घालू : आमदार यशवंत माने


सोलापूर : शिक्षकांना शंभर टक्के अनुदान आणि इतर मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेबभालशंकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षकांचं १०० टक्के अनुदान आणि इतर मागण्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासंदर्भात आमदार यशवंत माने यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत आमदार माने बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम उपाख्य काका साठे उपस्थित होते.

टप्पा अनुदानवरील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना सरसकट शंभर टक्के अनुदान मिळावे, सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी पदाचा वनवास संपावा, अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या प्रलंबित प्रस्तावांना मान्यता मिळावी, अधिसंख्य पदाबाबत दि. १४ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार नियुक्तीस मान्यता मिळावी, यासह अन्य मागण्यांसंदर्भात आ. यशवंत माने यांच्यासमवेत चर्चा झाली.

या शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा खजिनदार दाऊत आतार, संघटक सिध्देश्वर भुरले, उत्तर सोलापुर तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड, संतोष वाघमारे, सुभाष गायकवाड, युवराज सरवदे, अंगद गायकवाड आदी पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.