सोलापूर : पोलिसांबद्दल अपशब्द वापरणारे आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी 'न भूतो' शक्कल लढविली. प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर संपर्कप्रमुख जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात, वराहाच्या चेहऱ्यावर नितेश राणे यांचा फोटो ठेऊन प्रहारने 'प्रहार' केला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी उभयतांनी केली.
अकोला येथील सभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल अपशब्द वापरले. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी -कार्यकर्ते सात रस्ता एकत्र आले. त्यांनी राणेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी अफलातून पध्दत निवडली.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा भाग म्हणून हातगाडीत वराह आणून त्याच्या तोंडावर नितेश राणे यांचा फोटो ठेऊन निषेधाची घोषणाबाजी करत, नितेश राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी केली.
जेवत्या ताटावरून नारायण राणे यांना पोलिसांनी उठवले होते, त्यामुळे नितेश राणे याच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यामुळे ते पोलिसांबद्दल अपशब्द वापरत असल्याची टीका आंदोलकांनी केलीय.