सोलापूर: जिल्ह्यातील लोककलावंताच्या विविध मागण्यांची शासन दरबारी दखल घेण्याच्या आग्रहासाठी लोककलावंताच्या विविध संघटनांच्या वतीने गुरुवारी, ०८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या लोककलावंतांनी त्यांच्या लोककलांचेही शासनाच्या दारी सादरीकरण केले.
शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्या वतीने गुरुवारी, ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय धरणे आंदोलनाच्या निमित्ताने अनेक लोककलावंत पुराणातील अनेक व्यक्ती रेखांच्या रूपात आले होते, जणू प्रभू रामचंद्रजी आणि भक्त हनुमान पाहिले तर पाहणारेही रामायण काळापर्यंत पोहोचले असावे.
या मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन शासन दरबारी दखल घ्यावी, म्हणून जिल्ह्यातील वाघ्या-मुरळी, जात्यावरच्या ओव्या, कुडबुड्या जोशी, भेदिक शाहीरी, लोकशाहीर, कला पथक, भारुडकार, किर्तनकार, वासुदेव, संगित भजन, बहुरुपी, तमाशा, नाट्यकलाकार, (मराठी व कन्नड, तेलगु) गायक वादक, सनई वादक, सुंदरी वादक, बासरी वादक, सिंगवादक इत्यादी कलावंत बहुसंख्यने धरणे आंदोलनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आपआपल्या कलांचं दिवसभर सादरीकरण केलं.