सोलापूर : पत्रातालिम परिसरात पहाटेच्या सुमारास स्थानिक रहिवासी राजू यलशेट्टी यांच्या घरातील पाळीव मांजर अचानक परिसरात असलेल्या अशोकाच्या झाडावर चढून बसल्याचं दिसून आलं. त्यास खाली उतरण्यात अडचण होत असल्याने, शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने संकटात सापडलेल्या मांजराची सुखरूपपणे सुटका करण्यात आलीय. मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी जवानांनी घेतलेल्या परिश्रमाचं कौतुक करण्यात आलंय.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक दलाची गाङीही पत्रातालिमित दाखल झाली. अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर व झाडावर अडकलेल्या मांजराला पाहण्यासाठी स्थानिक परिसरातील लोकांची गर्दी वाढू लागली. अग्निशमन दलाच्या कर्तव्यदक्षतेमुळे अग्निशामक दल विभाग जवानांच्या अथक प्रयत्नानंतर मांजराची सुटका करण्यात यश आलं.
अग्निशामक दलाच्या जवान श्रीकांत भडके, संजय जगताप, विश्वनाथ काबणे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे राष्ट्रवादी सोशल मीडीया शहराध्यक्ष वैभव गंगणे व परिसरातील स्थानिक रहिवाशांनी आभार व्यक्त केलंय.
.... आवाहन
सोलापूरकरांना आवाहन करण्यात येते की, पाळीव प्राण्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी. असे वा अन्य काही प्रसंग आपल्या प्रभागात घडत असतील तर संबंधित तात्काळ अग्निशामक दलाच्या विभागास माहिती कळवावी, असे आवाहन अग्निशामक दल विभागाचे प्रमुख केदार आवटे यांनी केले आहे.