Type Here to Get Search Results !

'दो बूंद जिंदगी के' म्हणून जनमानसात रुजलेली मोहीम रविवारी; १, ०७,५२६ बालकांना पोलिओ डोस


सोलापूर : 'दो बूंद जिंदगी के' म्हणून जनमानसात रुजलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी  ०३ मार्च  २०२४ रोजी देशभरात  तसेच  सोलापूर  महानगरपालिका  कार्यक्षेत्रातील ० ते  ०५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे दोन थेंब तोंडावाटे  देण्यात येणार आहेत, तसेच ०३ मार्च रोजी काही कारणांनी बुथवर येऊ न शकलेल्या बालकांना ०४ ते  ०८ मार्च  या  कालावधीत त्यांच्या घरोघरी जाऊन पोलिओ लस देण्यात  येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त शितल उगले-तेली यांनी गुरुवारी सांगितले.

ही मोहीम आयुक्त महानगरपालिका, उपायुक्त   महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत राबवली जाणार आहे. एकही  लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्यात येत आहे.

पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी ३८० लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.  साधारणपणे १०८९ आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक व खाजगी वैद्यकीय संघटना इत्यादींच्या प्रयत्नातून ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील  एकूण  घरांची  संख्या  २,१५,८७७ इतकी असून  ०४  ते  ०८ मार्च या कालावधीत घरोघरी जाऊन वंचित लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यासाठी आय पी पी आय टीम संख्या  २१६, ट्रान्सीट टीम ७६, व  मोबाईल टीम २० कार्यरत  असणार आहेत. 

या मोहिमेमध्ये  एकूण १, ०७,५२६ बालकांना पोलिओ डोस देणार आहे.  पोलिओ लसीची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी प्रभावी शितसाखळी कार्यरत आहे.  महानगरपालिका  कार्यक्षेत्रातील सर्व ० ते ०५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजण्याचे  नियोजन करण्यात येत आहे.  प्रवास  करणाऱ्या बालकांना पोलिओ लस पाजण्यासाठी एस. टी.  स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मंदिरे, मॉल, टोल नाके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे.

पोलिओ या आजारामध्ये बालकाला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते, हे टाळण्यासाठी यापूर्वी पोलिओ  डोस घेतले असले तरीही हा अतिरिक्त डोस आपल्या बाळाला जवळचे बुथवर जाऊन अवश्य देण्यात यावा. आपल्या  देशातून पोलिओ निर्मूलन झाले असले तरी अजूनही या आजाराचा विषाणू सांडपाण्यात आढळून  आला आहे. त्यापासून आपल्या बाळाला संरक्षित  करण्यासाठी पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे दोन थेंब तोंडावाटे अवश्य देऊन घ्यावे, ही मोहिम यशस्वी  करावी, असं आवाहन शहरवासीयांना करण्यात येत आहे.