Type Here to Get Search Results !

अनुसूचित, नवबौद्धांच्या घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजना २३ फेबुवारीपर्यंत योजनांचे करावेत प्रस्ताव सादर : सहाय्यक आयुक्त चौगुले

 



सोलापूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक २३ फेबुवारी २०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूनं अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९० टक्के (कमाल मर्यादा ३.१५ लाख) शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा करण्यात येणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याची कमाल मर्यादा ३.५० लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर लाभ अनुज्ञेय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत व त्याबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत. बचत गटातील लाभार्थ्यांनी या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांचे विहीत नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच सदर परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत. असं आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त चौगुले यांनी केलं आहे.