सोलापूर,(प्रतिनिधी) : भगवान श्रीकृष्णाची भूमिका घराघरात पोहोचवून अजरामर करणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी सोलापूरला धावती भेट दिली. यावेळी प्रशांत बडवे यांनी त्यांचे स्वागत केले. यापुर्वी ते सोलापूरला एकदा आले होते आणि ग्रामदैवत श्री सिध्देश्वरामेश्वाराचे दर्शन घेतले असल्याच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला.
बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत सिरीयल मध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारत लोकांच्या घराघरात पोहोचलेले नितीश भारद्वाज हे मुंबईहून बेंगलोरकडे कार्यक्रमासाठी निघालेले असताना सोलापूरला काही वेळ ते थांबलेले होते. यावेळी दैनिक तरूण भारतचे संचालक प्रशांत बडवे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या समवेत हिंदी मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार आणि त्यांची पत्नी होते. सोलापूर रेल्वे स्टेशन वरील काही वेळाच्या भेटीत नितीश भारद्वाज यांनी सोलापूरच्या खाद्य पदार्थाबाबत कौतुक केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबतच्या दिल्लीतील आणि संसदेतील आठवणींनीही त्यांनी सांगितल्या. नितीश भारद्वाज हे झारखंड मधील जमशेदपूर आणि मध्यप्रदेशातील राजगढ येथून भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. १९९६ मध्ये ते जमशेदपूर मधील ज्येष्ठ नेते इंदरसिंग नामधारी यांचा पराभव करून ते खासदार म्हणून निवडून आले होते. मध्यप्रदेशातील भाजपाच्या संघटनात्मक कार्यामध्येही ते सक्रिय होते. त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त झाले सध्या ते विविध नाट्य आणि कलाकृती यामध्ये अधिक लक्ष देत आहेत.
सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी, मेथीची भाजी, खवा पोळी असे अस्सल सोलापुरी खाद्य आवर्जुन मागून घेतले. नंतर पुन्हा सोलापूरला यायला आवडेल ,असेही त्यांनी सांगितले. यावेळी सात्विक जेनरीक मेडिकलचे संचालक सात्विक बडवे, रसिका बडवे आदी उपस्थित होते.