Type Here to Get Search Results !

फसवणूक ... ! शेतीमालाची रक्कम पाठवून न देता व्यापाऱ्याची २१ लाख २१ हजार रूपयांची फसवणूक


सोलापूर : परप्रांतीय व्यापाऱ्यांनं व्यवसायात प्रारंभी विश्वास संपादन करून नंतरच्या काळात पाठविलेल्या शेतीमालाची रक्कम पाठवून न देता स्थानिक व्यापाऱ्याची २१ लाख २१ हजार रूपयांची फसवणूक केलीय. हा प्रकार २०१८ ते २०२० दरम्यान घडला. याप्रकरणी मुसा रफिक अहमद बागवान यांनी दाखल फिर्यादीनुसार त्या व्यापाऱ्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विडी घरकुलात वास्तव्यास असलेले मुसा रफिक अहमद बागवान यांचा सोलापुरातील मार्केट यार्डात, शेतीमाल खरेदी विक्रीचा व्यापार आहे. बागवान यांचे तामिळनाडूतील सुंदर राजन आणि सय्यद सिद्दीक अहमद (रा. चैन्नई) यांच्याशी व्यावसायिक कारणातून संबंध आले होते. उभयतांनी प्रारंभी बागवान यांना, त्यांनी पाठवलेल्या शेतमालाची रक्कम वेळोवेळी देत, त्यांचा विश्वास संपादन केला.

या दरम्यान २०१८ ते २०२० च्या दरम्यान उभयतांनी, बागवान यांच्याशी सुरळीत व्यापार केला. या विश्वासावर बागवान यांनी ४६,२०,९५१  रूपयाचा शेतमाल विक्रीसाठी तामिळनाडू येथे उभयतांकडे पाठविला. त्यापैकी २४,९९,९९५ रूपये  उभयतांनी त्यांच्या विविध खात्यातून फिर्यादीचे कॅनरा बॅक व महावीर बँक खात्यात आरटीजीएस ने  बागवान यांना दिले. उर्वरित २१,२०,९९५ रूपयांची रक्कम उभयतांनी बागवान यांना आजपर्यंत न देऊन नुकसान करण्यासाठी फसवणूक केली.

या  पैशाची मागणी केली असता, त्यांनी 'उलटा चोर कोतवाल को ढाँटे' या म्हणी प्रमाणे धमकावून शिवीगाळ केली. मुसा बागवान यांच्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलिसांनी सुंदर राजन आणि सय्यद सिद्दीक अहमद (रा. चैन्नई) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केलाय. सपोनि सोनवणे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.