सोलापूर : सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या, घरकुलात अपंगांना २५ टक्के सवलतीत १५०० दिव्यांगांना घरे देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंध, अपंग, व्यंग संस्थेच्या वतीने, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री मेघवाल यांना, सोलापूर विश्रामगृह येथे संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
या निवेदनात रे-नगर या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५ टक्के दिव्यांगाना म्हणजे एकूण १५०० घरे २५ टक्के सवलतीत मिळावे, असे नमूद करण्यात आले त्याचबरोबर ११३ दिव्यांगाना घरे दिल्याचे संस्थेच्या वतीने माहिती दिली आहे, परंतु प्रत्यक्षात एकाही दिव्यांगाला घर दिलेले नाही, यावरून संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थापक माजी आमदार नरसाई आडम मास्तर यांचा पूर्ण भोंगळ कारभार स्पष्ट दिसून येतो, म्हणून या संस्थेची सखोल चौकशी करून, कार्यवाही करावी, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात तौफिक शेख, ऋषिकेश मंडलकर, किशोर इगवे, घनश्याम रणदिवे, विजय बिराजदार, फातिमा शेख आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
रे नगर घरकुल योजनेत दिव्यांगांना २५ टक्के सवलतीत घरे मिळवून द्यावे, या मागणीचे निवेदन अपंग संस्थेच्या वतीने, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री यांना देताना, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी दिसत आहेत.