सोलापूर : 'तु गद्दार है, तुनेही हमारे नाम पोलीसको दिए है' असे म्हणत हारीस जमील शेख आणि त्याच्या साथीदारांनी ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेरे, कार्यालयाच्या काचा बॅनरबोर्ड वगैरे सामानाची तोडफोड करीत जीवे मारण्याची धमकी दिलीय. ही घटना शास्त्री नगरात विजापूरे किराणा दुकानाचे समोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालय येथे बुधवारी दुपारी घडलीय. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शास्त्रीनगरातील हारीस जमील शेख, अरबाज शब्बीर बेपारी ऊर्फ पोत्या, सैलानी अस्मल कुरेशी आणि शफी शकील करनकोट व अन्य ४ ते ५ जणांनी जमावानं येऊन 'तु गद्दार है, तुनेही हमारे नाम पोलीसको दिए है' मोहसीन तुझे हम छोडेंगे नहीं, खलास कर देंगे, असं म्हणत मोठ-मोठ्याने आरडाओरडा, शिवीगाळ करीत ऑफिसचे दोन सी सी टी व्ही कॅमेरे, ऑफिसचे काचा, बॅनर बोर्ड व ऑफिस मधील सामानाची तोडफोड करुन सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार बुधवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडला.
या प्रकरणी म.सलीम म.हुसेन नदाफ (वय ६२ वर्षे, रा. प्लॉट नं. १३, विजापूरे किराणा दुकानाचे समोर, शास्त्री नगर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात हारीस जमील शेख, अरबाज शब्बीर बेपारी ऊर्फ पोत्या याच्यासह इतरांविरुद्ध भादवि १४३,४२७,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.