Type Here to Get Search Results !

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद



सोलापूर : राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली, एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 किंवा 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेवून अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारूशीला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की राज्य शासनाकडून 15 एप्रिल 2023 पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाची विविध शासकीय विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. त्याच लाभार्थ्यांची निवड पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी त्या त्या विभाग प्रमुखांनी करून त्याची यादी प्रशासनाला सादर करावी. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून 40 ते 50 हजार लाभार्थी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळा कडून किमान 400 ते 500 बसेसची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी आणण्यासाठी प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्‍या ठिकाणी लाभार्थी आणत असताना एकाही लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी. लाभार्थ्यांना पाणी नाश्ता व जेवण आधी व्यवस्था करण्यात येणार असून ते वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

उपविभागीय अधिकारी पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंढरपूर व तहसीलदार पंढरपूर यांनी या कार्यक्रमासाठी वाखरी किंवा 65 एकर जागेची पाहणी करून पन्नास हजार लाभार्थी व त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था या अनुषंगाने माहिती प्रशासनाला त्वरित सादर करावी.  कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागाचे 50 स्टॉल लावले जाणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने 20, नगरपालिका 5, कृषी विभाग 5, पोलीस विभाग 2, आरटीओ 2 एमएसईबी 2, कौशल्य विकास 2, सिव्हिल हॉस्पिटल 2 व अन्य विभागाचे प्रत्येकी एक एक स्टॉल लावावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पंढरपूर येथे दिनांक 27 किंवा 28 फेब्रुवारी रोजी घेण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी करावी याबाबत सूचित करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार प्रत्येक विभागाला जबाबदारी देण्यात आली असून ती जबाबदारी प्रत्येकाने अत्यंत नियोजनबद्धरित्या पार पाडावी, अशी सूचना त्यांनी केली.