Type Here to Get Search Results !

लोकसभा उमेदवारीसाठी 'या' चेहऱ्याने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट; जोमाने कामाला लागण्याचे संकेत


सोलापूर :
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासोबत पक्ष कार्य केलेले दिलीप शिंदे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केलीय. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, कामाला लागा, असा शब्द दिला असल्याची माहिती लोकसभेचे इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी दिलीय.



भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात विरोधी बाकावर असताना दिलीप शिंदे यांनी पक्षकार्यास प्रारंभ केला होता. तत्कालीन अनेक नेत्यांशी त्यांचा चांगला परिचय होता. ज्यावेळी  मागास समाज लोकवस्तीतून पुढे आलेले कार्यकर्ते व नेते भाजप पक्षाचा विचार अन् विचारपीठापासून कोसो दूर होते, त्यावेळी दिलीप शिंदे यांनी शहर पातळीवर आपले पक्ष कार्य सुरू केले होते. त्यांना भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचं सानिध्य व मार्गदर्शन लाभले, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, अशी शिंदे यांचं प्रामाणिक मत आहे.

दिलीप शिंदे, मागास जाती पैकी हिंदू महार जातीचे असून त्यांनी  कुठल्याही पदाची अपेक्षा न  बाळगता प्रामाणिकपणे काम केलेला कार्यकर्ते व पदाधिकारी अशी त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे. त्यातच ते सोलापूरचे स्थानिक रहिवाशी आहेत. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीसंबंधी आलेले कटू अनुभव लक्षात घेता, सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार स्थानिक अभ्यासू शहर आणि जिल्हा पातळीवरील समस्यांची जाणीव असणारा असावा, अशी मतदार संघातील मतदारांची लोकभावना आहे.



दिलीप शिंदे यांनी जनमताचा कानोसा घेत, भाजपा प्रदेश आणि केंद्रीय पातळीवरील नेतृत्वांच्या संपर्कात आहेत. शिंदे यांनी, राज्य पातळीवरील नेतृत्वांपुढे आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह अन्य नेत्यांच्या गाठीभेटीवर जोर दिला असून त्या अनुषंगाने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.

दिलीप शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोकसभेसाठी इच्छुक चेहरा असल्याचे सांगितल्यावर पक्षाने तुम्हालाच उमेदवारी का द्यावी असा प्रश्न केला असता, जिल्हा पातळीवर गेली वीस वर्षांची पत्रकारिता अन् मंत्रालयात १६ वर्षांचा पत्रकारिता करीत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या सर्व प्रश्नांची जाण मला आहे, मी सोलापूरचे प्रश्न चांगल्या प्रकारे लोकसभेत मांडू शकतो. त्यातच मतदारसंघात आमच्या समाज मोठ्या प्रमाणात असून समाजामध्ये माझं चांगले काम असल्याचेही शिंदे यांनी म्हटलंय.

उपमुख्यमंत्र्यांशी विविध प्रश्नावर चर्चा झाली. त्यांनी आस्थेवाईकपणे सर्व माहिती जाणून घेतली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, 'दिलीप शिंदे, तुम्ही निश्चिंत रहा ! सोलापूर लोकसभेसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल,' अशी ग्वाही दिली.  तसंच जोमाने कामाला लागण्यासंदर्भात सूचित सुचित केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप कांबळे उपस्थित होते.