सोलापूर : मदरसा मध्ये उशीरा आल्याचा जाब विचारत तेरा वर्षीय बालकास जबर मारहाण करण्यात आलीय. ही घटना दक्षिण सदर बझार परिसरात शुक्रवारी,१६ फेब्रुवारी रोजी सकाळी घडलीय. मदरशातील विद्यार्थ्यांच्या बालमनात दहशत बसविण्याच्या उद्देशाने ही अमानुष मारहाण झालीय. याप्रकरणी अब्दुलकवी ढालायत (रा. रामवाडी, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दक्षिण सदर बझार, नॅशनल मेडिकलच्या बाजूस लष्करमधील रहिवासी अब्दुलराफे अब्दुलसलाम काझी (वय-४८ वर्षे) यांचा मुलगा अब्दुल गफुर (वय-१३ वर्षे) शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चावडी मस्जिदमधील मदरशात गेला, मात्र निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्याच्या कारणावरून धार्मिक शिक्षण देणारे शिक्षक अब्दुलकवी ढालायात यांनी त्यास वायरने पाठीवर, कमरेवर, मांडीवर आणि पार्श्वभागावर अमानुषपणे मारहाण केली.
शिस्तीच्या नावाखाली निर्दयतेने मारहाण करून झाल्यावर अब्दुलकवी ढालायात या शिक्षकाचं समाधान न झाल्याने त्यांनं मदरसामधील सर्व मुलांसमोर आता याला जसे मारलेले आहे, त्यावरून त्यांचे वडील व भाऊ मला विचारायला यायला पाहिजे, असं धमकावून इतर मुलांना याचेशी कोण बोलले तर याद राखा, असं म्हणत धमकी दिली.
हा प्रकार दिसून आल्यावर त्याच्या पालकांनी शनिवारी रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दाखल केलीय. त्यानुसार अब्दुल कवी ढालायत याच्याविरुद्ध भादवि ३२४,५०४,सह बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधि २०१५ चे कलम ७५,८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मसपोनि भाविष्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.