सोलापूर : शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी सांभाळता छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासावर आधारित शिवरायांची शिवगाथा या नाट्य सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या ४२४ व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातल्या ४२४ शहरामध्ये प्रत्येक शहरात ४२४ महिलांची राजमाता जिजाऊंच्या देशात भव्य रॅली काढण्याचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती चित्रकार अजित पाटील यांनी दिली.
ही रॅली, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून सुरू होऊन पार्क चौक येथील चार हुतात्मा पुतळा येथे येणार आहे. या रॅलीचा मुख्य उद्देश हा आधुनिक जगातील मॉडर्न मातांना आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून ठेवण्याच्या उद्देशाने महिलाना प्रबोधनातून आपल्या इतिहासातील शूर वीर महिलाच्या कला व स्वावलंबी महिला तयार करणे, असा आहे, असं पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
याकरिता सर्व तरुणी व महिलांनी आपापल्या शहरातील रॅली भव्यदिव्य काढण्याकरिता मोठ्या संख्येने सहभागी होऊन राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत जगण्याचे सौभाग्य मिळवा, तसेच आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी व टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन चित्रकार अजित पाटील यांनी केलं आहे.
या पत्रकार परिषदेस शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण कदम परिणीता शिंदे, लक्ष्मी लोंढे, संतोष गुजर, विष्णू माने आदी उपस्थित होते.