दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची उपलब्धता करण्यात येईल
सोलापूर : जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने टंचाईची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. टंचाई सदृश्य परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी अधिक सक्रीय होऊन गुणवत्तापूर्ण, टंचाई परिस्थितीला दूर करणारी नाविन्यपूर्ण कामे करावीत. दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची उपलब्धता करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गावसाने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा जंलसंधारण अधिकारी दामा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच संबधित अन्य विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात कोणत्या गावात टँकरची आवश्यकता आहे. याची संबधित तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा उपअभियंता, भुजल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करुन पाणीपुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. दुष्काळ परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सेल्फ वरील कामे सुरू करावीत .अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.