Type Here to Get Search Results !

श्री व्यंकटेश संगीत वि‌द्यालयाचा ३० वा संगीत महोत्सव

 


सोलापूर  : सोलापूरच्या संगीत विश्वात गेली सात दशकांपासून कार्यरत असलेल्या व अनेक नामवंत गायक, वादक तयार करण्यात मोलाचे योगदान दिलेल्या श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचा ०२ दिवसीय संगीत महोत्सव येत्या शनिवारी, ०६ व रविवारी, ०७ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा ३० वा संगीत महोत्सव असून या महोत्सवात कलकत्ता येथील आतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक हजरा सप्तर्षी यांचे सतार वादन व पुणे येथील ख्यातनाम गायिका यशस्विनी सरपोतदार यांच्या गायनाची मेजवाणी सोलापूरच्या रसिकांना मिळणार आहे, याप्रसंगी श्री व्यंकटेश संगीत विद्यालयातील विद्यार्थ्याच्या गायन व तबला वादनाची झलकही रसिकांना पहायला मिळणार असल्याची माहिती जतिन कुलकर्णी यांनी बुधवारी सकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवात रविवारी, ०७ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडीत मोहनकुमार दरेकर, मुंबई यांनी ६० व्या वर्षात नुकतंच पदार्पण केल्याप्रित्यर्थ त्यांचा श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने पुणे येथील सदाशिव देशपांडे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सोलापुरातील श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संस्थापक गुरुवर्य दिगंबरबुवा कुलकर्णी व गुरुवर्य दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयाच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे तिसावे वर्ष असून हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्पी थिएटरमध्ये दोन्ही दिवस सायंकाळी सहा वाजता या संगीत महोत्सवाला सुरुवात होईल, असंही जतिन कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

सोलापुरातील उ‌द्योजक सदानंद गुंडेटी, प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध शेडजाळे यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचे उ‌द्घाटन होईल. या दोन दिवसीय संगीत महोत्सवात अतिथी कलाकारांना तबल्याची साथ गणेश तानवडे तर हार्मोनियमची साथ संतोष कुलकर्णी करणार आहेत. अनिता बुरा या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत, असंही जतीन कुलकर्णी यांनी सांगितले.

शनिवारी, ०६ जानेवारी रोजी पुणे येथील प्रख्यात गायिका यशस्विनी सरपोतदार यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यापूर्वी संगीत विद्यालयातील विद्यार्थी स्वराज कुलकर्णी याचे सोलो तबला वादन व कनिष्का शिवपुजे आणि ईश्वरी दुलंगे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. रविवारी, ०७ जानेवारी रोजी कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतारवादक हजरा सप्तर्षी यांचे सतार वादन होईल. तत्पूर्वी श्री व्यंकटेश संगीत विद्यालयातील विद्यार्थिनी रसिका कुलकर्णी व सानिका कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन, देवश्री अग्नीहोत्री हिचे भरतनाट्यम व सतार वादन होईल. तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील रसिकांनी या संगीत महोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. असेही कुलकर्णी यांनी या पत्रकार परिषदेत  सांगितले.

या पत्रकार परिषदेस पौर्णिमा शिवपुजे, दत्ता मोकाशी आदी उपस्थित होते.