Type Here to Get Search Results !

भारती विद्यापीठातर्फे सायकल रॅलीचे आयोजन


सोलापूर : भारती विद्यापीठाच्या वतीने समाज प्रबोधन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. या सप्ताह दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी, o८ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता भारती विद्यापीठ विजापूर रोड पासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार होते. 

भारती विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांची जयंती व भारती विद्यापीठाचे कार्यवाह महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोमवारी, ०८ ते १३ जानेवारीदरम्यान समाज प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 


सायकल रॅलीच्या सुरुवातीला अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूरचे संचालक डॉ. एस. बी. सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी सायकल रॅली आयोजित करण्यामागचा हेतू विशद केला. प्रमुख पाहुणे नरेंद्र पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सायकल चालवण्यामागचे महत्व विशद केले. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलीचा वापर करावा, असं आवाहन क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले. 

या रॅलीमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थी व नागरिक यांनी सहभाग नोंदवला. या रॅलीच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याचे व प्रदूषण कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. 


यावेळी भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मांडक, ग. सा. पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोळे, भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर च्या मुख्याध्यापिका मोहोळे, भारतीय सहकारी बँकेचे शाखाप्रमुख हत्याळीकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. राहुल मांजरे यांनी केले तर सचिन सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

रॅलीचा मार्ग -

भारती विद्यापीठ, आय. टी. आय. कॉलेज, पत्रकार भवन, सात रस्ता, प्रथम हॉटेल, महावीर चौक, आसरा, डी. मार्ट ते दावत चौक, परत भारती विद्यापीठ.