सोलापूर : आज प्रगतीकडे वाटचाल करीत असताना संपूर्ण जगात इंधन व तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असून यामुळे सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी सोलर सिस्टिमचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आयआयटी, मुंबई येथील प्राध्यापक चेतनसिंग सोळंकी यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एनर्जी स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात प्रा. सोळंकी हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा. सोळंकी म्हणाले की, आज सृष्टीचे तापमान वाढलेले आहे. वातावरणात बदल झालेले आहे. प्रदूषण वाढले आहे. कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्याने सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सोलर सिस्टिमचा वापर वाढवून निसर्गाचे समतोल राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा. सोळंकी यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोलर सिस्टिमचा वापर केला जातो. यापुढे देखील याचा अधिक वापर केला जाईल. यामुळे वीज, इंधन याची बचत होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठीही निश्चितच मदत होणार आहे. सोलारचा वापर पशु, पक्षी, प्राणी सर्वांनाच उपयुक्त राहणार असल्याचे मतही कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. वीरभद्र दंडे यांनी मानले.
.......फोटो ओळी.....
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयआयटी, मुंबई येथील प्रा. चेतनसिंग सोळंकी यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा व अन्य.