Type Here to Get Search Results !

नव संकल्पनांना उद्योगात परावर्तीत करुन ब्रँडीग करा : अमित जैन


सोलापूर विद्यापीठात अविष्कार महोत्सवाचा समारोप

सोलापूर : विद्यार्थ्यांच्या नव संकल्पनांना उद्योगामध्ये परावर्तीत करणारे व्यासपीठ म्हणजे अविष्कार महोत्सव होय. अविष्कारमधुन येणार्‍या नव संकल्पना उद्योगात परावर्तीत करुन त्याचे ब्रँडीग करणे आवश्यक आहे. तरच जगात आपली ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशनचे अध्यक्ष अमित जैन यांनी केले.



गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार महोत्सवाच्या समारोप प्रसंगी अमित जैन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मिकांत दामा उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे, अविष्कार समन्वयक डॉ. विनायक धुळप, सह समन्वयक डॉ. अशोक शिंदे उपस्थित होते. यावेळी अविष्कार महोत्सवामध्ये सहा विभागातुन प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी अविष्कार संशोधन महोत्सव विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला होता. तो आज यशस्वी झाला.


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमित जैन म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतत नव निर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे, उद्योगांची नवनिर्मिती केली तरच जगाच्या स्पर्धेत आपण टिकु शकतो. ज्या विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेत क्रमांक मिळाला नाही, त्या विद्यार्थ्यांनी खचुन जाता कामा नये, अपयश हे सतत नविन काही ना काही शिकवत असते आणि ते पुढील जिवनास मार्गदर्शक ठरत असते. सोलापूर हे जगात युनिफॉर्म निर्माण करणारे  गाव अशी ओळख ब्रँडीगच्या माध्यमातुन केली आहे. वेगवेगळ्या 30 हजार युनिफॉर्मचे डिजाईन आपल्याकडे तयार असल्याचे अमित जैन यांनी यावेळी सांगीतले. नव संकल्पना आणि नव उद्योग निर्मीतीमध्ये महिलांना मोठी संधी आहे. महिलांनी नव संकल्पना उद्योगात परावर्तीत करुन रोजगार निर्माण करावा, असे अवाहन अमित जैन यांनी यावेळी केले.



यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मिकांत दामा म्हणाले, अविष्कार स्पर्धेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी खुप चांगल्या संकल्पना सादर केल्या. विद्यार्थ्यांनी आपली कल्पना समाज आणि देशाच्या विकासासाठी महत्वाची आहे. अविष्कार महोत्सवासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ पुढील स्पर्धेसाठी सहकार्य करील, असे स्पष्ट केले. या महोत्सवात एकूण ४५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून एकूण ४८ स्पर्धकांची निवड झाली आहे. ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार करिता सहभाग नोंदवतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविष्कारचे समन्वयक डॉ. विनायक धुळप यांनी केले. तर आभार डॉ. अशोक शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.