Type Here to Get Search Results !

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

सोलापूर : श्री छत्रपति शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे (शिवस्मारक) बुधवार, १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारक सभागृहात कै. अनंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेचे हे २५ वे वर्ष आहे. शालेय आणि महाविद्यालयीन गटातून ही स्पर्धा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे गट असतील. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकच गट असणार आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभू श्रीराम एक प्रेरणा, महाराष्ट्रातील थोर संत, माझी आई, मी शेतकरी बोलतोय हे विषय असणार आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्राचे आदर्श प्रभू श्रीराम, शिवचरित्र एक संस्कार, सुसंवादाचे कुटुंबातील महत्त्व, माझ्या स्वप्नातील भारत हे विषय असणार आहेत. तर महावि‌द्यालयीन गटासाठी अयोध्या-जागतिक तीर्थ, राष्ट्राची प्रेरक शक्ती शिवराय, मतदान राष्ट्रभक्तीचे साधन, पर्यावरण व शाश्वत विकास हे विषय असतील.



स्पर्धा मराठी व हिंदी भाषेत होणार असून प्रत्येक स्पर्धकास आठ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक गटातून प्रथम तीन बक्षिसे देण्यात येणार असून अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असेल. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत आठ जानेवारी असणार आहे. या निःशुल्क जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अधिकाधिक शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी ९८२२४९८३७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धाप्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केले.

या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, खजिनदार आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी, शिवस्मारकचे संचालक प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.